गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईची लोकल बंद आहे. ही लोकल सर्वसामान्यांसाठी कधी पुन्हा रुळावर धावणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान सर्वसामान्य मुंबईकरांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार असल्याचे दिसून येत आहे. लॉकडाउनच्या काळात सार्वजनिक वाहुतक सेवा बंद करण्यात आली होती. यानंतर, अनलॉक लागू करण्यात आला व सार्वजनिक वाहतूक देखील सुरु करण्यात आली. मात्र, मुंबईतील लोकलसेवा मात्र बंदच ठेवण्यात आली आहे.
‘लोकलसंदर्भात चर्चेसाठी मुंबई महानगरपालिका आयुक्तांनी एक बैठक बोलावली आहे. नुकतंच यासंदर्भात एक वृत्त ऐकलं होतं आणि आज लगेच आम्हाला चर्चेसाठी बोलावलं आहे. मला वाटतं कदाचित 29 जानेवारी किंवा 1 फेब्रुवारीपासून कदाचित मुंबई लोकलं सर्वसामान्यांसाठी सुरु होण्याची शक्यता आहे.’ असं भाष्य किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.
यादरम्यान मध्य आणि पश्चिम रेल्वेकडून महत्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेत २९ जानेवारीपासून अतिरिक्त २०४ लोकल फेऱ्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे सध्या सुरु असलेल्या लोकल फेऱ्यांची संख्या २७८१ वरुन २८९५ वर पोहोचणार आहे. मध्य रेल्वेने लोकल फेऱ्यांची संख्या १५८० वरुन १६८५ तर पश्चिम रेल्वेने १२०१ वरुन १३०० वर नेण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने परवानगी दिलेल्यांनाच प्रवास करता येणार आहे. इतरांनी रेल्वे स्थानकांवर गर्दी करु नये असं आवाहन करण्यात आलं आहे. तसंच प्रवाशांना करोनासंबंधित नियमांचं पालन करण्यास सांगितले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव अद्याप संपलेला नसल्याने गर्दी होणार नाही अशा पद्धतीने लोकल सेवा सर्वांसाठी कशा प्रकारे सुरु करता येईल यादृष्टीने विविध पर्यायांवर बैठकीत चर्चा करण्यात आली.