अन्वय नाईक प्रकरण सध्या देशभरात गाजत आहे. अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणी रायगड पोलिसांनी रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामीला अटक केली आहे. अर्णब गोस्वामी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. अर्णब गोस्वामीची रवानगी अलिबागमधील नगरपालिकेच्या शाळेत करण्यात आली होती. काल, अर्णबच्या जामीनावर सुनावणी झाली मात्र तिथे देखील त्याला न्यायालयाने दिलासा न दिल्याने आज त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
अर्णबवरील कारवाई राजकीय सूडबुद्धीने केली जात असल्याचा आरोप भाजप नेत्यांनी केला आहे. तसेच, राज्यभरात ठिकठिकाणी भाजपतर्फे आंदोलन देखील करण्यात येत आहेत. अर्णबची सुटका व्हावी म्हणून उपोषण करणारे भाजपचे आमदार राम कदम आता अर्णब गोस्वामीच्या सुटकेसाठी थेट सिद्धिविनायकाला साकडे घालणार आहेत. घाटकोपर येथील त्यांच्या निवासस्थानापासून प्रभादेवीच्या सिद्धिविनायक मंदिरापर्यंत पदयात्रा करणार असून अर्णब यांच्या सुटकेनंतरच दिवाळी साजरी करणार असल्याचं कदम यांनी म्हटलं आहे. अर्णब यांना करण्यात आलेली अटक चुकीची आहे. त्याचा आम्ही विरोध करत आहोत. असंही त्यांनी म्हटलंय.