राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचं झालं निधन

7

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि गुरसाळे येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष भारत तुकाराम भालके यांचे शुक्रवारी मध्यरात्री पुण्यातील रूबी हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान निधन झाले. भारत भालके यांना ३० ऑक्टोबरला करोनाची लागण झाली होती. त्यानंतर पुण्यातील रुबी हॉस्पिटल मध्ये उपचार घेऊन कोरोनातून बरे होऊन ते घरी आले होते. परंतु काही दिवसांनी त्यांची तब्बेत पुन्हा बिघडली होती.

भालके यांची प्रकृती बिघडल्याची समजल्यावर राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी रुबी हॉस्पिटलला भेट दिली होती. मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास वाढल्याने आज दिवसभर त्यांची प्रकृती चिंताजनक होती. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, तीन विवाहित मुली, सून आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे. आमदार भालकेंच्या निधनामुळे पंढरपूर तालुक्यात शोककळा पसरली आहे. आमदार भालके यांच्या पार्थिवावर शनिवारी सकाळी पंढरपूरमधील सरकोली या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.