केंद्रातील तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता दोन महिने होऊन गेले आहेत. तरीही कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा पाहता सरकारने धास्ती घेतल्याचं सध्या चित्र आहे. प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण मिळाले होते.
दरम्यान, केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना आता दिल्लीत घुसणं अवघड होणार आहे. कारण सरकारने आंदोलनांच्या ठिकाणी दिल्लीकडे जाणाऱ्या सीमांवर कडेकोट बंदोबस्त केला आहे. तसंच बॅरिकेड्सच्या भींतींसह लोखंडी टोकदार सळया रस्त्यांवर लावल्या आहेत.
दरम्यान, आंदोलक शेतकऱ्यांना रोखण्यासाठी सरकारने केलेल्या या कृतीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. भारत-चीन सीमेवर खिळे लावले असते तर चिनी सैन्य भारतात घुसलं नसतं, अशी प्रतिक्रिया संजय राऊत यांनी दिली.
शेतकऱ्यांचं आंदोलन पंजाबच्या शेतकऱ्यांचं किंवा एखाद्या राज्याचं आंदोलन नाही. हा देशाचा विषय आहे. त्यावर सरकारने चर्चा केली पाहिजे. तोडगा काढला पाहिजे, असं सांगतानाच अंहकाराने देश चालत नाही, अशी टीकाही शिवसेना नेते राऊत यांनी केली.