हणेगावच्या मध्यवर्ती बँकेत संथगतीने अनुदान वाटप कर्मचाऱ्यांचा अभाव, दुष्काळी अनुदान न मिळाल्याने शेतकरी हतबल

सिकंदर शेख दावणगीरकर

देगलूर (नांदेड) :
येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखेत शेतकऱ्यांच्या हक्काचे आलेले अनुदान मात्र वेळेवर मिळत नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. जवळपास चाळीस खेड्यांचा कारभार असलेल्या या बँकेत कर्मचाऱ्यांचा अभाव व दलालांची चलती यामुळे अगोदरच नावारूपास आलेल्या या बँकेत जमा असलेले अनुदानच वेळेवर मिळत नसल्याने शेतकऱ्यांत नाराजीचा सूर दिसत आहे.

जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या हणेगाव शाखेत नेहमीच सावळागोंधळ असतो. परिणामी या बँकेच्या या गोंधळामुळे नागरिक वैतागले आहेत. शासनाच्या वतीने जवळपास या बँकेअंतर्गत असलेल्या चाळीस खेड्यांच्या शेतकऱ्यांसाठी आलेले दुष्काळी अनुदान जवळपास सहा महिन्यांपूर्वी या बँकेत जमा आहे. परंतु आजपर्यंत बऱ्याच गावच्या शेतकऱ्यांना तो वितरित करण्यात आला नाही. परिणामी नागरिकांची हक्काची बँक पैसे वेळेवर देत नसल्यामुळे या बँकेबद्दल रोष व्यक्त होत असताना दिसून येत आहे.

नेहमी चर्चेत राहणाऱ्या येथील बँकेत विविध गावच्या सेवा सोसायटीचे चेअरमन सदैव चिकटून राहतात. याउपरही दलाली करणाऱ्या लोकांची याठिकाणी खूप मोठी किंमत आहे. त्यामुळे सर्वसामान्य लोकांच्या हिताची कामे अडगळीला पडतात. यानंतर याठिकाणचा व्याप पाहता रोखपाल, शिपाई व अन्य कर्मचाऱ्यांची संख्या ज्या पद्धतीने असायला हवी, ती दिसून येत नाही. कर्मचाऱ्यांचा अभाव हीदेखील याठिकाची गेल्या अनेक वर्षांपासूनची समस्या आहे.

परिणामी येथे शासनाच्या माध्यमातून येणारे अनुदान मिळविन्यासाठी नागरिक, शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे. या बँकेअंतर्गत येडूर व अन्य काही गावात अद्याप दुष्काळी अनुदान शेतकऱ्यांना मिळालेले नसल्याने शेतकरी हताश झाला आहे. तर बहुतांश गावात दुसऱ्या टप्प्यात आलेली रक्कम अद्यापही अदा करण्यात आलेली नाही. दरम्यान येथील दलालांना नामी संधी देण्यापेक्षा बाहेरची वाट दाखवुन, कर्मचारी संख्या वाढवावी व जनतेची होत असलेली गैरसोय दूर करावी, अशी मागणी केली जात आहे.