हर्षवर्धन जाधव कुटुंबातील वाद मागील अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु आता त्याला वेगळं वळण मिळालं आहे. वृद्ध दाम्पत्याला मारहाण केल्याप्रकरण कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव पुण्यात अटकेत आहे. त्यांना अजूनही जामीन मिळालेला नाही.
माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांच्या अनुपस्थितीत कन्नडच्या राजकाराणात नवा ट्विस्ट पाहायला मिळाला. सध्या ग्रामपंचायत निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत हर्षवर्धन जाधव यांच्या पॅनलची घोषणा करण्यात आली आहे. कन्नड सोयगाव मतदार संघात हर्षवर्धन जाधव पॅनल निवडणूक लढणार आहे.
विशेष म्हणजे हर्षवर्धन जाधव यांचा अकरावीत शिकत असलेला मुलगा आदित्य जाधव यांने थेट पत्रकार परिषद घेऊन वडिलांच्या पॅनलची अधिकृत घोषणा केली. धक्कादायक म्हणजे हे पॅनल आपली आई संजना जाधव यांच्या विरोधात असणार आहे. संजना जाधव ह्या भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या कन्या आहेत.
वडीलांच्या अनुपस्थितीत आईच्या विरोधात पॅनल उभे करण्याचं नियोजन ११ वी मध्ये शिकणाऱ्या आदित्य जाधव याने केलं आहे. तसेच सर्व तालुक्यात हर्षवर्धन जाधव पॅनल निवडणूक लढविणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे. सदर पत्रकार परिषदेत मुरब्बी राजकारणाला लाज वाटेल अशा शब्दात आदित्य जाधव याने बेधडक उत्तरे दिली.