18 वर्षांपासून पाकिस्तान जैलमध्ये कैद हसीना बेगम आज भारतात परतल्या

19

अठरा वर्षांपासून पाकिस्‍तानच्या तुरुंगात असलेल्या हसीना बेगम अखेर मायदेशी परतल्या आहेत. २००२ मध्ये आपल्या एका नातेवाईकाला भेटायला लाहोरला गेल्या होत्या. तेथे दुर्दैवाने त्यांचा पासपोर्ट हरवला होता. त्यामुळे तब्बल १८ वर्ष पाकिस्तानच्या जेलमध्ये काढावे लागले. औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तान न्यायालयात केलेल्या पाठपुराव्यामुळे त्यांची सुटका झाली आहे. 

औरंगाबाद पोलिसांनी त्यांना मायदेशी आणण्यासाठी प्रयत्न केले. आता मंगळवारी, दि.२६ रोजी प्रजासत्ताक दिनी त्या आपल्या मायदेशी परतल्या आहेत. हसीना बेगम यांनी वयाची ६५ वर्षे पूर्ण केली आहेत. औरंगाबाद येथे परतल्यानंतर हसीना बेगमच्या नातेवाईकांनी तिचं स्वागत केलं. यावेळी औरंगाबाद पोलिस अधिकारीही उपस्थित होते.

हसीना म्हणाल्या, ‘मी खूप कठीण काळातून गेले. आता माझ्या देशात परतल्याने मला शांती मिळाली. मला वाटत आहे की मी स्वर्गात आहे. मला पाकिस्तानमध्ये जबरदस्तीनं कैद केलं होतं. ‘त्या म्हणाल्या, ‘मला सोडवण्यासाठी औरंगाबाद पोलिसांनी प्रयत्न केले. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते.’

औरंगाबाद पोलिसांनी या प्रकरणी अहवाल सादर केल्यानंतर मंगळवारी 26 जानेवारीला त्या भारतात परतल्या. मायदेशी परतल्यानंतर त्यांचे नातेवाईक आणि औरंगाबाद पोलीस दलातील अधिकाऱ्यांनी त्यांचं स्वागत केलं. “मी अनेक अडचणींचा सामना केला आणि आता मायदेशी परतल्यानंतर मला शांततेची जाणीव झाली आहे.

हसीना बेगम यांच्या नावावर औरंगाबादच्या सिटी चौक पोलीस स्टेशन अंतर्गत एक अधिकृत घर आहे, अशी माहिती औरंगाबाद पोलिसांनी पाकिस्तानला पाठवली होती. त्यानंतर पाकिस्तानने मागील आठवड्यात त्यांची सुटका केली आणि त्यांना भारताच्या अधिकाऱ्यांकडे सोपवले.