अलिगड मुस्लिम विद्यापीठाचा विद्यार्थी शरजिल उस्मानी
याने पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेत प्रक्षोभक भाषण केले. यावरून भाजपनं पुण्यातील स्वारगेट पोलिसांत सोमवारी तक्रार दाखल केली. या कार्यक्रमाला याआधीच विरोध झाला होता. मात्र, पुणे पोलिसांनी परवानगी दिल्यानंतर एल्गार परिषदेचा कार्यक्रम पुण्यात पार पडला.
‘आजचा हिंदू समाज सडला आहे. मी इथे एक अल्पसंख्याक तरुण म्हणून आलो असून युद्धाची सुरुवात करण्यासाठी आलो आहे,’ असे आक्षेपार्ह विधाने शरजिल उस्मानी याने केले आहेत. त्यावर भाजप आक्रमक झाले आहे. राज्य सरकार व पोलीस कारवाई का करत नाही, असा प्रश्नच भाजपने उपस्थित केला आहे.
भाजपचे नेते निलेश राणे यांनी शरजिल उस्मानी याच्यावर जोरदार टीका केली आहे. ‘एक हरामी शरजील उस्मानी हिंदू समाजावर टीका करतो पण त्याच्यावर फक्त FIR केली जाते. त्याला भर चौकात ओल्या बांबूचे फटके दिले पाहिजे, परत कुठल्या हरामीची हिम्मत होणार नाही हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघायची’. असा इशारा निलेश राणे यांनी दिला आहे. त्यांनी ट्विट करत आपली भूमिका जाहीर केली.