दिवाळीच्या निमित्ताने सर्वजण नवीन वस्तूंची खरेदी करतात. यंदाची दिवाळी अभिनेत्री हेमांगी कवीसाठी अतिशय खास आहे. यावर्षी हेमांगीने आपल्या हक्काच्या घरात दिवाळी साजरी केली. दिवाळी पाडव्याच्या शुभमुहूर्तावर तिने नव्या घरात गृहप्रवेश केला आहे. हेमांगीने सोशल मिडियावर हा आनंद व्यक्त करत फोटो शेअर केला आहे.
हेमांगीचे पती संदीप धुमाळ हे सीनेमोटोग्राफर आहेत. त्यांच्या आणि हेमांगीच्या कल्पनेतून हे घर झालं आहे. गृहप्रवेश केल्याचं सांगत हेमांगीने आपल्या नवीन घराचे फोटो शेअर केले आहेत. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात दोघांनी या नव्या घरात गृहप्रवेश केला होता मात्र कामामुळे या घरात त्यांना वेळ घालवता आला नाही. त्यामुळे यंदाची दिवाळी त्यांनी नव्या घरात साजरी केली.
हेमांगीने केलेल्या पोस्ट मध्ये लिहले आहे की, नव्या नवलाईने गृहप्रवेश हो झाला, क्षण एकच पण नाविन्याचा झाला. मुंबईसारख्या मोठ्या ठिकाणी घर घेणं आम्हाला अशक्य होतं. म्हणून म्हाडा मध्ये 8 वर्ष आम्ही प्रयन्त केले. आणि 2016 मध्ये आम्हाला लॉटरी लागली आणि बोरीवलीमध्ये आम्हाला घर मिळालं. त्याआधी आम्ही भाड्याच्या घरी दादरला आणि दहीसरला राहायचो. पण स्वतःच घर यायला 2019 उजाडले. यंदाची दिवाळी आम्ही आमच्या हक्काच्या घरात साजरी करतोय, तुमचे आशीर्वाद असुद्या!