या आठवड्यात “SCAM 1992” आणि “HIGH” या दोन वेबसिरीज रिलीज झाल्या…हर्षद मेहताचा इतिहास आणि आपल्याला युट्यूबवर prank बघायची आवड असल्या कारणाने, शेअर मार्केटला पध्दतशीरपणे PRANK करणाऱ्या “SCAM 1992” ची खूप चर्चा झाली आणि परिणामी “HIGH” या वेबसिरीज ला तेवढा प्रेक्षकवर्ग लाभला नाही.
दुसरीकडे त्याच दिवशी “HIGH” ही वेबसिरीज रिलीज झाली.या सिरीज मध्ये “ड्रग्स”च्या आहारी गेलेल्या “शिव”च्या नजरेतून या वेबसिरीज ची मांडणी केली आहे,ज्यात मित्राच्या सोबत असलेला तरुण ड्रग्स च्या अतिसेवनामुळे बेशुद्ध होतो….या संधीचा फायदा घेऊन आपल्या मित्राचे व्यसन सुटावे या हेतूने शिव ला एका व्यसनमुक्ती केंद्रात नेऊन सोडतात.
या व्यसनमुक्ती केंद्रात औषधासोबतच शिव ला ड्रग्स दिली जाते.या ड्रग्स चे सेवन केल्यावर त्याला समजते की,आजपर्यंत आपण घेतलेल्या ड्रग्स पेक्षा या ड्रग्स ची नशा जास्त आहे आणि हे ड्रग शरीरासाठी उपयुक्त आहे.या ड्रग्स ची माहिती घेतली असता त्याला समजते की एक रोगाच्या औषधाचा शोध लावत असताना डॉक्टरांनी असे ड्रग बनवले आहे जे जगातील सर्वात नशेबाज तर आहे पण त्यातून शरीराला कसलीही हानी पोहचत नाही.
इथेच या वेबसिरीज मध्ये ट्विस्ट येतो आणि शिव आणि डॉक्टर “ड्रग्स” च्या बाजारात उतरतात.
ड्रग्स म्हणजे काही गावातील किराणा दुकान नाही,की वाटलं आणि टाकलं…शिव आपल्या ओळखीने हे ड्रग्स विकायचे प्रयत्न करत असताना या क्षेत्रातील प्रस्थापित मंडळींशी याचे वैर येते आणि पुढे त्यांच्यात कसा वाद होतो,वेगवेगळ्या गँग मधील भांडणे,ड्रग्स चे नेटवर्क,पोलिसांची हफ्तेखोरी,फेकन्यूज ची ऍक्टर म्हणून वावरणारी महिला पत्रकार,राजकारण्यांच्या वरदहस्ताने चालणारे न्यूज चॅनल,नक्षलवादी घोषित केलेला एक वैज्ञानिक आणि या ड्रग्स मुळे धंदा बंद पडण्याचा अंदाज आलेली फार्मसी कंपनीची मालकीण आणि तिने कामावर ठेवलेला सिरीयल किलर अशी बरीच पात्रे प्रभावीपणे मांडण्यात आले आहेत.
ही सिरीज संथ गतीने चालत असली तरी त्या गतीनेच प्रत्येक पात्र आणि त्याची गोष्ट खुलत जाते आणि वेबसिरीजचा शेवट होईपर्यंत माणूस या “व्हाईट पावडरच्या,काळ्या बाजारात”गुंतून जातो.
“मी तर बघितलाय, तुम्हीपण बघा”
- सुयोग देशमुख