दिल्लीचं राजकारण परवडलं पण गल्लीच राजकारण नको असं म्हटलं जातं. राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. गावागावात राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकांविरोधात दोन हात करण्याची तयारी चालवली आहे. त्यासाठी अमर्याद खर्च करण्याचीही उमेदवारांची तयारी आहे.
पैशांचा मोठा सुळसुळाट ग्रामपंचायत निवडणुकीत पाहायला मिळतो. त्यातून दारू, मटण अशी मतदारांना आकर्षित करणाऱ्या गोष्टींचं वाटप मोठ्या प्रमाणात होतं. गावात अनेक वाद उद्भवत असतात. त्यावर महाराष्ट्रातील एका आमदाराने नामी उपाय शोधत गावकऱ्यांना मोठी ऑफर दिली आहे. गावची ग्रामपंचायत बिनविरोध निवडून दिल्यास, आमदार निधीतून त्या गावाला 25 लाख रुपये देण्याचा निर्णय पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतला आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीमुळे प्रशासनावर मोठा ताण पडतो. तसेच निवडणुकीला मोठा खर्च होतो. याला आळा बसवण्यासाठी बिनविरोध निवडणूक होणे गरजेचे असल्याचे मत आमदार निलेश लंके यांनी व्यक्त केले. गावचा संघर्ष यामुळे कमी होईल, आणि गावचा विकास यातून साधता येईल, असे आमदार लंके म्हणाले.