सचिन वाझेंना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा : भाजपची मागणी

18

एनआयएच्या तपासात सचिन वाझेंवर काही आरोप ठेवण्यात आले आणि त्यांना अटक करून निलंबित केले. अशा परिस्थितीत, ‘सचिन वाझेंना पाठीशी घालणाऱ्या गृहमंत्री अनिल देशमुख यांनी राजीनामा द्यावा’, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली.

भाजप नेते प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओसोबत त्यांनी एक कॅप्शनदेखील लिहिलं. “सचिन वाझे प्रकरणातील जी मोठी नावे बाहेर येतायत किंवा येतील आणि यातून झालेली मुंबई पोलिसांची नाचक्की खेदजनक आहे. अशा लोकांना पाठीशी घालणे अत्यंत चुकीचे आहे, त्यामुळे याची नैतिक जबाबदारी राज्याच्या गृहमंत्र्यांनी स्वीकारून राजीनामा द्यावा!”, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.

या प्रकरणात दोन डीसीपी पदाचे अधिकारीदेखील संशयाच्या भोवऱ्यात आहेत. त्यामुळे जोपर्यंत या प्रकरणात गृहमंत्र्यांचा राजीनामा घेतला जात नाही, तोपर्यंत या प्रकरणाचा छडा लागणार नाही”, असंही लाड म्हणाले.

गृहमंत्र्यांचा राजीनाम घेतला गेलाच पाहिजे. किंवा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी स्वत: नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे”, अशी मागणी प्रसाद लाड यांनी केली.