‘मी शेतकऱ्याची लेक’; शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी शरद पवारांचा ‘हा’ प्रतिनिधी गाझीपूरला जाणार

13

केंद्रातील तीन कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला आता दोन महिने होऊन गेले आहेत. तरीही कृषी कायद्यांविरोधात नोव्हेंबरपासून शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवर आंदोलन करत आहेत. शेतकरी नेते टिकैत यांनी सरकारच्या अन्यायाला जुमाननार नसल्याची भूमिका घेतली आहे.

शेतकऱ्यांच्या या आंदोलनाला दिवसेंदिवस वाढत असलेला पाठिंबा पाहता सरकारने धास्ती घेतल्याचं सध्या चित्र आहे.  प्रजासत्ताक दिनी शेतकरी आंदोलनात शेतकऱ्यांनी काढलेल्या ट्रॅक्टर रॅलीला हिंसेचे वळण मिळाले होते.

दरम्यान, आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे गाझीपूरला जाऊन आंदोलक शेतकऱ्यांची भेट घेणार आहेत. याआधी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिष्टमंडळाने गाझीपूरला जाऊन शेतकऱ्यांची भेट घेतली होती. आता सुप्रिया सुळेही आज गाझीपूर सीमेवर जाऊन शेतकऱ्यांना भेटून त्यांना आपला पाठिंबा देतील.

मी शेतकऱ्याची लेक आहे. केंद्र सरकार शेतकऱ्यांबरोबर ज्या प्रकारे वागतंय ते पाहून दु:ख होतंय. मराठीमध्ये एक म्हण आहे अन्नदाता सुखी भव: परंतु आज अन्नदाताच आंदोलन करतोय. मी केंद्र सरकारला एक विनंती करते की त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांशी चर्चा करुन त्यांना न्याय द्यावा, असं सुप्रिया सुळे यांनी ‘एएनआयशी’ बोलतांना म्हटलं आहे.