विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदार संघात महाविकास आघाडीचा मोठा विजय झाला. तर, भारतीय जनता पार्टीला मोठ्या पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
हा पराभव भाजपच्या जिव्हारी लागला असून भाजप नेत्यांनी पराभव स्वीकारत, शिवसेनेला तर खातही उघडता आलं नाही म्हणून मुख्यमंत्र्यांवर टीका केली.
यावर शिवसेनेचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. त्यांच्या दुःखात मी सहभागी आहे असा टोला संजय राऊत यांनी भाजपाला लगावला. आम्हाला आनंद असून निवडणुकीत हार-जीत होत असतात. भाजपचे पदवीधरचे मतदारसंघ ढासळले. यातून महाराष्ट्रातील चित्र बदलले असल्याचे दिसते. महाविकास आघाडीला जनतेचा पाठिंबा नाही असे म्हणणाऱ्यांना पदवीधर निकालावरून कळलं असेल. अशी कोपरखळी त्यांनी भाजपला लगावली.