‘मी पुन्हा येईन’ : योग्य वेळी शपथ घेईन, पहाटे शपथ घेणार नाही : देवेंद्र फडणवीस

2

महाराष्ट्राच्या राजकारणात अनाकलनीय घटनांची कमी नाहीय. अशाच एका घटनेची आज वर्षपूर्ती आहे. आज एक वर्षापूर्वी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहाटे पहाटे शपथ घेतली होती.

त्यावरून सोशल मीडियावर दोन्ही नेत्यांची खिल्ली उडवली जात आहे. त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. आता पहाटे नाही तर योग्य वेळीच शपथ दिसेल, असं विधान फडणवीस यांनी केल्याने पुन्हा एकदा तर्कवितर्कांना उधाण आलं आहे. औरंगाबादमध्ये प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना देवेंद्र फडणवीस बोलत होते.

ठाकरे सरकार हे बेईमानीने आलेलं सरकार आहे. हे सरकार किती काळ टिकेल हे माहीत नाही. यावर आता बोलणं योग्य नाही. मात्र, या पुढे पहाटे शपथ घेणार नाही. योग्य वेळी शपथ घेतली जाईल, असं सूचक विधान करतानाच अशा गोष्टी आठवणीत ठेवायच्या नसतात, असं ते म्हणाले. तसेच ज्या दिवशी सरकार पडेल त्या दिवशी राज्यात दुसरं सरकार देऊ, असं विधानही त्यांनी केलं आहे.

संजय राऊत म्हणाले…

महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या पहाटेच्या शपथविधीला आज एक वर्ष पूर्ण झालं आहे. त्यावरून शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे. पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. ते मिडियासोबत बोलत होते.

“ती पहाट नव्हती तो अंधकार होता. आम्हाला कोणताही धक्का बसला नव्हता. आमच्या सर्व स्मृती सुखदायक आहेत. त्या पहाटेच्या सुद्धा. पहाटेनंतर त्यांना धक्के बसले, त्यातून ते अद्याप सावरलेले नाहीत. पहाटे पहाटे मला जाग आली. अजून ते झोपलेले नाहीत,” असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. “पुन्हा ती पहाट येणार नाही, कधीच येणार नाही,” असाही विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.