आज (ता.21 ) विधानसभेचे माजी सभापती व आमदार हरीभाऊ बागडे व खासदार डॉ. भागवत कराड, भाजपचे नगर जिल्हाध्यक्ष प्रा. भानुदास बेरड यांनी हजारे यांची राळेगणसिद्धी येथे भेट घेतली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना शेतक-यांच्या विविध मागण्यांसंदर्भात केंद्र सरकारने दिलेली अश्वासने न पाळल्याने हजारे यांनी आंदोलनाचा इशारा देताच केंद्र सरकारला जाग आली आहे .
आपल्या मागण्यांबाबत लवकरच निर्णय घेऊ. आम्हाला थोडा वेळा द्या अशी विनंती त्यांना करण्यात आली. या वेळी केंद्र सरकारने नव्याने केलेल्या शेतकरी कायद्यांचीही माहिती हजारे यांना दिली. या वेळी हजारे यांनी दिल्लीतील आंदोलनाबाबत व नवीन कृषी कायद्यावर मी बोलणार नाही.मी माझ्या मागण्यावर ठाम आहे असे मत मांडले.
हजारे यांनी नवीन कृषी कायद्याबाबत काहीच न बोलता मला केंद्र सरकारने दोन वर्षापूर्वी जे अाश्वासन दिले ते पाळले नाही. त्यामुळे मी पुन्हा आंदोलनाचा विचार मांडला आहे. मार्च 2018 साली दिल्लीत व फेब्रुवारी 2019 साली राळेगणसिद्धीत मी शेतक-यांच्या विविध मागण्यासंदर्भात आंदोलन केले. त्यावेळी केलेल्या मागण्यांबाबत मला केंद्रीय कृषी मंत्री, तसेच राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री व संरक्षण राज्यमंत्री यांनी लेखी अश्वासन दिले होते. ते त्यांनी पाळले नाही. त्यास दोन वर्ष झाली. त्यामुळे मी आंदोलनाचा विचार करीत आहे ,असेही ते म्हणाले