“मला प्रश्न पडलाय फडणविसांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का ?”

46

पंढरपूर येथील शिवतीर्थावर झालेल्या सभेत काल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी लोकांना संबोधित केले. भाजपने ५ वर्षे पक्षीय राजकारण केले. भारतनाना काँग्रेसचे आमदार होते म्हणून भाजपने त्यांच्या २४ गावांच्या पाण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले. आज फडणवीस इथे येऊन सांगत आहेत की भाजपला मत द्या. मी पंतप्रधान मोदी यांच्याकडून पैसे आणतो. मोदी यांनी महाराष्ट्राच्या हक्काचा जीएसटीचा परतावा अद्याप दिला नाही तर इतर मागण्या काय मान्य करतील? असा सवाल पाटील यांनी केला.

भाजप प्रचार करताना सांगतंय की आम्हाला भारतनानांबद्दल आदर आहे. भाजपला भारतनानांबद्दल आदर आहे तर मग ही निवडणूकच का होत आहे ? मंगळवेढा-पंढरपूरची जनता सूज्ञ आहे. ते नक्कीच निवडणुकीच्या निकालाच्या माध्यमातून भाजपला योग्य उत्तर देतील.

भाजपकडे आता कार्यकर्त्यांची अत्यंत कमतरता आहे. कार्यकर्त्यांना भाजपमध्ये न्याय मिळत नाही म्हणून अनेक जण महाविकास आघाडीची वाट धरत आहे. हे चित्र पाहता मला प्रश्न पडला आहे की देवेंद्र फडणवीस यांचे विरोधी पक्षनेते पद तरी पाच वर्षे टिकून राहील का? असा प्रश्न त्यांनी भाजपला केला.

विठ्ठल रखुमाई मंदिर परिसरातील लोकांचे प्रश्न आहेत. कारखान्याचे प्रश्न आहेत, शहरातील इतरही प्रश्न आहेत. इथला कायापालट करण्यासाठी महाविकास आघाडी सरकार भगीरथ यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार आहे. त्यामुळे नानांच्या भगीरथला मत स्वरुपात आशीर्वाद द्या. असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.