राज्यात कोरोनाच्या वाढत्या रुग्णांना रुग्णालयात दाखल होण्यासाठी रुग्णवाहिकेची तुटवडा भासत आहे. यातच रुग्णवाहिका मालक अवाजवी दर आकारत असल्याच्या घटना समोर आल्या आहेत. अशा गोष्टी करणे अत्यंत चुकीचे असून जे लोक यात चुका करतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले आहे.
राज्य शासनाने जवळपास ७ घटकांवर दराची निश्चिती केली आहे. एपिडेमिक ॲक्ट व डिझॅस्टर मॅनेजमेंट ॲक्टच्या तरतुदीनुसार हे दर निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये रुग्णवाहिका, बेड, प्लाझ्मा, एचआरसीटी, आरटीपीसीआर, मास्क अशा गोष्टींचा समावेश होतो. म्हणूनच सामान्य माणसाची कोणतीही लूट होता कामा नये असे आवाहन नराजेश टोपे यांनी सर्व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना केले आहे.
रुग्णवाहिका संदर्भात ज्या घटना घडल्या आहेत. त्यामध्ये संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याचे वेळप्रसंगी गुन्हे दाखल करण्याचे आदेश राजेश टोपे यांनी दिले आहेत. तसेच देशात केंद्र सरकारने पुरवलेल्या ऑक्सिजन साठ्यावर अनेक चुकीच्या घटना घडत आहेत. ज्या राज्याचा ऑक्सिजन साठा आहे त्याच राज्याला तो मिळायला हवा अशा सक्त सूचना केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केल्या असल्याचेही राजेश टोपे यांनी सांगितले.
त्यामुळे कोणीही स्वतःच्या राज्यासाठी नियम डावलून काही करणे अत्यंत चुकीचे आहे. असे घडले तर याची तक्रार त्वरित केंद्र सरकारला करू असा इशारा टोपे यांनी दिला आहे. केंद्र सरकार याची निश्चितच दखल घेईल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. केवळ दरासाठी ऑक्सिजनचा साठा इकडेतिकडे घेऊन जाणे हा गुन्हा आहे असं स्पष्ट मत राजेश टोपे यांनी मांडले आहे.