विजय वडेट्टीवार हे काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत. त्यासाठी विजय वडेट्टीवार यांनी मंगळवारी दिल्लीत काँग्रेस सरचिटणीस के सी वेणूगोपाल यांची भेट घेतली. विद्यमान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी आपल्या खांद्यावरील जबाबदारीची झूल उतरवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यानंतर नव्या प्रदेशाध्यक्षपदाचा शोध सुरु आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष बदलण्यास राष्ट्रवादीला कुठलीही हरकत नसल्याचं समजतं. राज्यात सरकारला पूर्ण बहुमत आहे. काँग्रेसने विधानसभा अध्यक्ष बदलण्याचं ठरवल्यास महाविकास आघाडी सरकार आणि राष्ट्रवादीला कोणतीही अडचण नाही. त्यामुळे विद्यमान विधानसभा अध्यक्ष नाना पटोले थोरातांच्या ऐवजी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या खुर्चीवर बसण्याची शक्यताही बळावली आहे.
बैठकीनंतर वडेट्टीवार यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्यातील नवा प्रदेशाध्यक्ष फायटर असावा. तसेच आपण के.सी. वेणुगोपाल यांच्याशी पक्ष संघटना व ओबीसी समाजाच्या मागण्यांबाबत चर्चा केल्याचेही वडेट्टीवार यांनी सांगितले.महाराष्ट्रात काँग्रेसने नव्या प्रदेशाध्यक्षाची निवड करायची ठरवल्यास तो लढाऊ बाण्याचा असावा, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली.