पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीचा जाहीरनामा काँग्रेस पक्षाने नुकताच जाहीर केला. यामध्ये अन्य पक्षांप्रमाणे काँग्रेसने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजना आखल्या आहेत. त्यातील एक मुद्दा चर्चिला जातोय. सत्तेत आल्यास राज्यातील प्रत्येक गृहिणीला प्रत्येक महिन्याला १००० रूपयांची आर्थिक मदत देण्याचे या जाहीरनाम्यात आश्वासन दिलं गेलंय.
मोफत कोव्हीड लसीकरण, नवे शिक्षण धोरण आणि शहिदांच्या कुटुंबीयांना पेन्शन अशा घोषणाही काँग्रेसकडून सदरील जाहीरनाम्यात करण्यात आल्या आहेत. आता विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला या जाहीरनाम्यातील घोषणांचा कितपत फायदा मिळतो. हे येणाऱ्या काळात पाहायला मिळेलच.
काँग्रेसचे माजी केंद्रीय मंत्री वीरप्पा मोईली यांच्या उपस्थितीत काँग्रेसचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला. या जाहीरनाम्यात वैद्यकीय प्रवेशासाठीची नीट परीक्षा आणि नवे शैक्षणिक धोरण रद्द करण्याचे आश्वासन पुदुच्चेरीच्या रहिवाशांना देण्यात आले आहे. तसेच कराईकलमध्ये कृषी विद्यापीठ आणि एक विधी विद्यापीठ स्थापन करु, असेही काँग्रेसने जाहीरनाम्यात म्हटले आहे.