केंद्र सरकार आणि राज्य शासनात लासिवरून जोरदार रस्सीखेच चालू आहे. राज्य सरकार जेवढ्या प्रमाणात लसींचा पुरवठा मागत आहे, तेवढ्या प्रमाणात केंद्र सरकारने लस पुरविल्यास राज्यात दररोज आठ लाख नागरिकांचे लसीकरण करु शकतो, अशी भूमिका राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मांडली आहे.
राज्यात १३ हजार संस्था आहेत. यात प्राथमिक आरोग्य केंद्र, उपचार केंद्र, जिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय अशा संस्था येतात. या प्रत्येक केंद्रावर दिवसाला १०० लसी दिल्या तरी राज्यात रोज १३ लाखांचे लसीकरण होऊ शकते. ही महाराष्ट्राची शक्ती असल्याचे राजेश टोपे म्हणाले.
याआधी पोलिओ आणि इतर आजारांच्या लसीकरणात राज्याने प्रथम क्रमांक पटकावला होता. आताही कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात महाराष्ट्र सर्वात पुढे आहे. तसेच राज्यात लस वाया जाण्याचे प्रमाण देखील अवघा एक टक्का आहे.
तेच देशातील इतर राज्यात चार ते सहा टक्क्यांपर्यंत लसी वाया जात आहेत. हे सर्व निकष पाहता राज्याला अधिक प्रमाणात लस मिळावी, ही आमची नम्रतापूर्वक मागणी असल्याचे राजेश टोपे म्हणाले.