मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या १६८० कोटी रुपयांच्या पाणीपुरवठा योजनेसह सफारी पार्क, स्व. बाळासाहेब ठाकरे स्मृतीवन व १५२ कोटीतून होणाऱ्या रसत्यांच्या कामाचे भुमीपूजन करणार आहेत. पण केवळ दोनशे निमंत्रितांना प्रवेश देण्यात येणार आहे. मग मुख्यमंत्र्यांनी आॅनलाईन भुमीपूनज केले असते तरी चालले असते असा टोला भाजप आमदार अतुल सावे यांनी दिला आहे.
या पार्श्वभूमीवर भाजपचे आमदार अतुल सावे यांनी पत्रकार परिषद घेऊन पाणीपुरवठा योजने संदर्भात काही प्रश्न उपस्थित केले.ही योजना मंजूर करताना महापालिकेला द्यावा लागणारा हिस्साही राज्य सरकार देईल, असा शब्द दिला होता. मात्र महाविकास आघाडी सरकारने आता निधी उपलब्धतेला मंजुरी देताना पालिकेकडून तब्बल ३० टक्के निधी भरण्याचे हमीपत्र घेतले आहे. प्रत्यक्षात यातील १ टक्का हिस्साही पालिका भरू शकत नाही, त्यात ६३३ कोटी रुपये कठून भरणार, असा सवाल भाजपचे आमदार अतुल सावेे यांनी केला.
तत्कालीन महापौर नंदकुमार घोडेले यांनी मला विनंती केल्यानंतर मी मुख्यमंत्र्यांकडे एक टक्का निधी (१७ कोटी ) प्रकल्पाच्या प्रोजेक्ट कॉस्टमधून वळती करून घेण्याचे एमजेपीला सूचित करावे, अशी मागणी केली होती. आता मात्र ३० टक्के रक्कम महापालिकेला भरावी लागणार आहे, ती ते कुठून भरणार, असा प्रश्न आहे. या कारणामुळे ही योजना रखडू नये, यासाठी सरकरनेच या रक्कमेचा भार उचलावा, जनतेवर या योजनेचा कुठलाही भार पडु देऊ नये, अशी अपेक्षा व मागणी सावे यांनी केली.
पत्रकार परिषदेत खासदार भागवत कराड, शहाराध्यक्ष संजय केणेकर, भाजपच्या राष्ट्रीय मंत्री विजया रहाटकर, शिरीष बोराळकर, अनिल मकरिये, प्रमोद राठोड, शिवाजी दांडगे, प्रशांत देसरडा आदी उपस्थित होते.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात उद्योग राज्यमंत्री झाल्यावर ५५ दिवसात शहरासाठी १६८० कोटीची नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून घेतली होती. याच योजनेचे शनिवारी (ता.१२) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन होत आहे.