‘निवडणुकीमुळे कोरोना नष्ट होत असेल तर, केंद्रातील सरकारही बरखास्त करून देशात निवडणुका लावाव्यात’

12

कोरोना परिस्थिती हाताळण्यात केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी ठरले असून त्यांनी आता आपली जबाबदारी राज्य सरकारांवर ढकलून जनतेला वाऱ्यावर सोडले आहे पण राज्य सरकारने जनतेला वाऱ्यावर सोडू नये वेळप्रसंगी कर्ज काढावे आणि सर्वांचे लसीकरण करावे अशी आग्रही मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

मार्चच्या पहिल्या आठवड्यात कोरोना परिस्थितीत थोडासा सुधार झाला त्यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी कोरोना मुक्तीचे श्रेय घेण्यासाठी आता कोरोनाची भिती राहिली नाही, असे प्रसिद्धीपत्रक काढून जनतेला कोरोनाच्या खाईत ढकलण्याचे पाप केले. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही निवडणुका असलेल्या राज्यात कोरोना नाही अशी मुक्ताफळे उधळली आहेत.

निवडणुकीमुळे कोरोना नष्ट होत असेल तर मग केंद्रातील सरकारही बरखास्त करून सर्व देशात निवडणुका लावाव्यात कोरोना नष्ट होईल असा टोला पटोले यांनी लगावला. राहुल गांधी यांनी कोरोनाचे गांभीर्य ओळखून पश्चिम बंगाल मधील प्रचारसभा रद्द केल्या. मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही प्रचारसभा रद्द केल्या परंतु प्रधानसेवक मात्र आजही दिवसाला चार-चार सभा घेत आहेत.

पत्रकारपरिषदेला प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस व प्रवक्ते सचिन सावंत, अतुल लोंढे, गोपाळ तिवारी, प्रदेश काँग्रेसच्या ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्रमोद मोरे, डॉ. संजय लाखे पाटील, देवानंद पवार, राजाराम देशमुख आदी उपस्थित होते.