माजी गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनी सप्टेंबर २०२० मध्येच विधिमंडळाच्या अधिवेशनात विधान परिषदेमध्ये ऑक्सिजनच्या आणीबाणीबाबत इशारा दिला होता. त्यावेळी त्यांनी सरकारला १५ ठिकाणी ऑक्सिजन प्लांट सुरू करण्याचा सल्लाही दिला होता.
वैद्यकीय क्षेत्रातून असल्यामुळे वेगवेगळ्या डॉक्टरांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारावर राज्यातील ऑक्सिजन उपलब्धतेची स्थिती त्यावेळीच गंभीर वळणावर असल्याचा इशाराही डॉ. पाटील यांनी दिला होता. त्यावर उपाययोजना म्हणून त्यांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयांमध्ये किमान १५ ऑक्सिजन प्लांट उभे करण्याचा सल्ला दिला होता.
त्यानुसार सरकारने कार्यवाही केली असती तर आज राज्यात निर्माण झालेल्या परिस्थितीचा सामना करावा लागला नसता. याबाबत त्यांनी विधान परिषदेत केलेल्या भाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावरून चांगलाच व्हायरल होतो आहे.
राजकारण बाजूला ठेवून त्यावेळी या उपाययोजनेबाबत गांभीर्याने विचार करण्यात आला असता तर सध्या राज्य सरकार ऑक्सिजन मिळविण्यासाठी जी धावपळ करीत आहे आणि रुग्णांचे ऑक्सिजन अभावी हाल सुरू आहेत ते कदाचित थांबविता आले असते.