‘संघर्षातून मार्ग काढला तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल’; ‘या’ नेत्याचा कार्यकर्त्यांना कानमंत्र

10

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या काल चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा येथील कार्यकर्त्यांशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी संवाद साधला. निवडणुकीत आघाडी असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात पक्षाने एकही जागा लढवली नाही. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून गेले. मात्र आजही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सच्चा कार्यकर्ता राजुरा येथे पक्षासाठी काम करत आहे. मी त्या सर्व कार्यकर्त्यांचे, पदाधिकाऱ्यांचे मनापासून कौतुक करतो, असे उद्गार जयंत पाटील यांनी काढले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष वाढवण्यासाठी आपण आता कंबर कसली पाहिजे. अनेक जण पक्षात येण्यास इच्छुक आहेत, त्यांना योग्य दिशा द्या, पक्षाची बुथ कमिटी मजबूत करा आणि जनसंपर्क वाढवा, असे आवाहन जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना केले.

तसंच आयुष्यात यशस्वी व्हायचं असेल तर संघर्ष करा, संघर्षाशिवाय गत्यंतर नाही ! या संघर्षातून तुम्ही मार्ग काढला तर उद्याचा सूर्य राष्ट्रवादी काँग्रेसचा असेल. असा संदेश त्यांनी युवा कार्यकर्त्यांना दिला.

यावेळी माजी मंत्री रमेश बंग, विदर्भ दौरा समन्वयक प्रवीण कुंटे पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, जिल्हाध्यक्ष राजेंद्र वैद्य, नागपूर जिल्हा परिषद सदस्य सलील देशमुख आणि पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.