भाषा नीट करा नाही तर…. निलेश राणेंची अजित पवारांवर जहरी टिका

763

सामाजिक न्यायमंत्रीधनंजय मुंडे बलात्कार प्रकरण आणि नवाब मलिक यांच्या जावयाला ड्रग प्रकरणी झालेल्या अटकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेसवर सध्या संकटाचे वादळ आले आहे. या प्रकरणांवरून भाजप राष्ट्रवादी काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करत आहे. खासदार निलेश राणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नेहमी टीका केल्या आहेत. जितके गुन्हेगार एका जेलमध्ये नसतील तितके राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहे, अशी जहरी टीका देखील त्यांनी केली आहे.

निलेश राणे यांच्या या टीकेनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील प्रत्युत्तर दिले होते. निलेश राणे वाट्टेल ते बोलतात आणि त्यावर मी व्यक्त व्हायचे का, असं अजित पवारांनी सांगितले. तसेच त्या निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधानही अजित पवार यांनी पुण्यातील सर्किट हाऊस येथे बोलताना केले होते.

अजित पवारांच्या या विधानानंतर आता पुन्हा निलेश राणे यांनी ट्विट करत समाचार घेतला आहे. निलेश राणे ट्विटमध्ये म्हणाले की, फार कमी नेते आहेत की ज्यांना महाराष्ट्रमध्ये अनेक वर्ष मंत्रीपदे मिळाली. मात्र तरीपण महाराष्ट्राच्या विकासामध्ये काही परिणाम झाला नाही. त्यामध्ये अजित पवारांचे नाव घ्यावं लागेल, असं निलेश राणे यांनी सांगितले. अजित पवारसाहेब भाषा नीट करा नाहीतर हा निलेश राणे तुमची घमंड उतरविल्याशिवाय राहणार नाही.

तसेच दुसरं, माहिती लपवणं निवडणूक आयोगानुसार गुन्हा समजला जातो आणि त्या गुन्ह्याखाली धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिलाच पाहिजे, अशी मागणी देखील निलेश राणे यांनी केली आहे.