आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल तर लढायलाच लागेल: छगन भुजबळ

0

आज महात्मा फुले यांच्या १३० व्या पुण्यतिथी निमित्त गंज पेठ येथील समता भूमी येथे त्यांनी भेट दिली. यावेळी माध्यमांशी संवाद साधताना काही मराठा समाजाचे नेते ओबीसी आरक्षण रद्द करा असे म्हणत आहेत. यावर आपल्या आरक्षणावर, हक्कांवर गदा येत असेल तर लढायलाच हवे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. महाविकास आघाडी सरकारच्या वर्षपूर्तीवर विरोधकांकडून होत असलेल्या टिकांवर उत्तर देताना,’आम्ही कधीही मराठा आरक्षणाला विरोध केला नाही, आघाडी सरकारच्या काळात कायदा केला. भाजप सरकारने कायदा केला तरीही आम्ही पाठिंबा दिला. विरोधकांचे काम काय असते, तर विरोध करणे ते त्यांचे काम करत आहेत. सरकार आपले काम करत आहे.

मराठा समाजाचे नेते म्हणतायत ओबीसी आरक्षण रद्द करा. पण काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना सर्वांचेच म्हणणें आहे की ओबीसीला धक्का लागू न देता मराठा आरक्षण मिळाले पाहिजे. विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र ,मराठवाडा येथे पूर आला. त्यासाठी १० हजार कोटी, महात्मा फुलेंच्या नावावर शेतकऱ्यांनसाठी योजना आखली. त्यासाठी २० हजार कोटी रुपये खर्च केले .तिजोरीत पैसे येत नसताना, लॉकडाऊन असताना सरकारने आरोग्यासाठी जो काही खर्च करता येईल तो केला असे स्पष्टीकरण देखील भुजबळ यांनी दिले

महात्मा फुलेंनी आपल्याला लढायला शिकवले. त्यासाठीची प्रेरणा घेऊन जायचं आहे. जातीसाठी, राजकारणासाठी भांडण केली जातात. त्यातून बाहेर पडायचे आहे. पण आपल्या हक्कांवर गदा आणू देयचा नाही. काही नेते मराठ्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावे यासाठी न्यायालयात गेले आहेत. अशावेळी ओबीसी समाजाला जागृत करणे आमचे काम आहे आणि आम्ही ते करत आहोत असेही ते म्हणाले.