परभणी जिल्ह्यातील गंगाखेड शहरातून एका टेम्पोतून कत्तलखान्याकडे जाणारी 14 जनावरे गंगाखेड पोलिसांच्या सतर्कतेमूळे वाचली आहेत. गंगाखेड शहरातून एमएच 04 एफयू 1235 या क्रमांकाच्या टेम्पोमधून पडदा टाकून जनावरे जात होती. गंगाखेड पोलिसांना त्या टेम्पोचा संशय आला. पोलिस निरीक्षक वसुंधरा बोरगांवकर यांच्यासह कर्मचार्यांनी तो टेम्पो अडवून विचारपूस सुरु केली. तेंव्हा टेम्पोतील 14 जनावरांची बेकायदा वाहतूक होत असल्याची बाब निदर्शनास आली.
पोलिसांनी टेम्पोची तपासणी केली. त्यावेळी टेम्पो चौदा बैल अक्षरशः कोंबून चढविल्या गेले होते. त्यांचे पाय एकमेकांना बांधल्या गेले होते. पोलिसांनी संशय आल्यापाठोपाठ तो टेम्पो गंगाखेड पोलिस ठाण्यात आणला. विचारपूस केली, तेंव्हा ती 14 जनावरे कत्तलखान्याकडे जात असल्याची बाब स्पष्ट झाली.
पोलिस निरीक्षक बोरगांवकर यांनी परभणी जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक सोसायटी सदस्य, श्री छत्रपती शिवाजी महाराज गो शाळेचे संचालक तथा बजरंगदलाचे देवगिरी प्रांत संयोजक शिवप्रसाद कोरे यांना पाचारण केले व ही जनावरे गो शाळेतून संभाळण्याकरीता सुपूर्द केली. गंगाखेड पोलिसांच्या व छत्रपती शिवाजी महाराज गो शाळेमुळे या जनावरांचे प्राण बचावले.
दरम्यान, प्राणीक्लेश प्रतिबंधक सोसायटीचे सदस्य शिवप्रसाद कोरे यांनी गंगाखेड पोलिसांच्या सतर्कतेसह सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले. ज्ञानदेव बेंबडे व मुरकूटे यांच्यासह अन्य कर्मचारी या कारवाईत सहभागी होते.