विशेष न्यायालयाचा महत्वपुर्ण निर्णय:शौविक चक्रवर्तीवरील आरोप गैरलागू

9

सुमारे तीन महिन्यांपासून तुरूंगात असलेल्या शौविक चक्रवर्ती याच्यावर अंमली पदार्थ खरेदीविक्री किंवा या धंद्याशी त्याचे संबंध असल्याचे आरोप गैरलागू असल्याचे विशेष न्यायालयाने स्पष्ट केले आहे. अंमली पदार्थ खरेदी-विक्री आणि या धंद्याशी संबंध असल्याच्या आरोपावरून अभिनेत्री रिया चक्रवर्ती आणि तिचा भाऊ शौविक चक्रवर्ती यांना तीन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती.मात्र महिन्याभरानंतर रियाला जामीन मिळाला होता.

शौविकचा ड्रग पेडलरशी थेट संबंध असल्याचा दावा करत त्याचा जामीन अर्ज फेटाळण्यात आला होता. नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने (एनसीबी) शौविक आणि रिया चक्रवर्ती यांच्याविरोधात एनडीपीएस कायद्याच्या कलम 27A ची मागणी केली होती. नार्कोटिक्स ड्रग्स अँड सायकोट्रॉपिक सबस्टन्स अ‍ॅक्टअंतर्गत विशेष कोर्टाने याबाबत महत्त्वाचा निर्णय दिला आहे.

विशेष कोर्टाचे न्यायाधीश जी.बी. गुरव यांनी आपल्या आदेशात म्हटले आहे की, ‘एनडीपीएस कायद्याच्या कलम 27 ए च्या तरतूदी या प्रकरणात गैरलागू आहेत’. रिया चक्रवर्तीविरोधात कलम 27 A लावण्यात आले होते. मात्र, तिच्याविरोधात हे आरोप योग्य नसल्याचे न्यायालयाने नमूद केले होते. शौविक प्रकरणात सह-आरोपींची विधाने आणि जबाब एनसीबीने त्याच्याविरूद्ध पुरावा म्हणून सादर केली होती.सर्वोच्च न्यायालयाने एनसीबीचे विशेष अधिकार काढून घेतल्याचे न्यायालयाने म्हटले आहे. सहआरोपींच्या कबुलीजबाबांचे कोणतेही कायदेशीर मूल्य नाही आणि ते न्यायालयात अपात्र आहेत. सहआरोपींच्या कबुलीजबाब आणि विधानंवरून कोणालाही दोषी ठरविले जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने नमूद केले आहे.