मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेसमोर महापालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी मोठं आव्हान असणार आहे. त्यामुळे शिवसेनेने मुंबई महापालिका जिंकण्यासाठीचे प्रयत्न सुरु केले असल्याचं सध्या पाहायला मिळतंय. मुंबईत अमराठी मतदार सुद्धा मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांना आकर्षित करण्यासाठी शिवसेनेने प्रयत्न चालवले आहेत.
‘मुंबई मा जलेबी ना फाफडा, उद्धव ठाकरे आपडा’ असं म्हणत शिवसेनेने गुजराती मतदारांना साद घातली आहे. शिवसेना संघटक हेमराज शहा यांच्यावर गुजराती मतदारांची जबाबदारी सोपवली गेली आहे. तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या मुंबई महापालिकेवर एकहाती सत्ता मिळवण्यासाठी कंबर कसली आहे. मुंबई महानरपालिका ताब्यात घेण्यासाठी सगळेच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत.
यावर आता भाजपचे नेते व केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शिवसेनेला लक्ष्य केलं आहे. ‘शिवसेनेची भूमिका परप्रांतीयांच्याबाबत अनेकवेळा समोर आलेली आहे. आता सत्तेत आल्यावर त्यांची भूमिका आपण पाहत आहोत. भविष्यात ते मुस्लिम समाजाचादेखील मेळावा घेऊ शकतात. कारण त्यांची बिचाऱ्यांची भूमिका बदलली. हा संगतीचा परिणाम आहे. कदाचित अन्य पक्षाच्या सोबत राहिल्यावर त्यांची भूमिका बदलली असेल’, असा खोचक टोला दानवेंनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना लगावला.