अवघ्या 24 तासात राज ठाकरेंनी नेमला डोंबिवलीचा ‘हा’ नवा शहराध्यक्ष

28

कल्याण-डोंबिवली महापालिका निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर येऊन ठेपली असताना मनसेला 24 तासात दोन जोरदार धक्के बसले आहेत. डोंबिवलीत अचानक दोन मोठ्या नेत्यांनी मनसेची साथ सोडली आहे. सोमवारी मनसेचे डोंबिवली शहराध्यक्ष राजेश कदम यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत शिवसेनेत प्रवेश केला, त्यापाठोपाठ मनसेचे गटनेते आणि माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनीही पक्षांतर केले.

त्यामुळे थेट अध्यक्ष राज ठाकरे यांनी तातडीने हस्तक्षेप करून डॅमेज कंट्रोल केले आहे. या घडामोडीनंतर मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांनी कृष्णकुंजकडे धाव घेतली. राज ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर तातडीने यावर तोडगा काढण्यात आला आहे. यात आमदार राजू पाटील यांचीही उपस्थिती होती, यावेळी मनोज घरत यांना मनसेच्या डोंबिवली शहराध्यक्षपदी नियुक्ती करण्याचे आदेश राज ठाकरेंनी दिले.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची ध्येय धोरणे आणि कार्यक्रम आपण वेळोवेळी आपल्या विभागात निष्ठेने राबवावी आणि यामध्ये आपणाकडून कोणतीही कुचराई किंवा तडजोड स्वीकारली जाणार नाही, याची आपण नोंद घ्यावी. आपण आणि आपल्या सहकाऱ्यांकडून समाजाला कोणत्याही प्रकारचा उपद्रव होणार नाही, अशा प्रकारचे आपले वर्तन असेल, अशी अपेक्षा यावेळी मनोज घरत यांना सुपूर्द केलेल्या नियुक्ती पत्रात व्यक्त करण्यात आली आहे. आपली नेमणूक एक वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात आली आहे. आपला शहर अध्यक्षपदाचा कार्य अहवाल पाहूनच पुढील मुदतवाढीसंदर्भात निर्णय घेतला जाईल, असंही या पत्रात म्हटलं आहे.