कल्याण-डोंबिवलीत मनसेला आणखी एक मोठा झटका बसला आहे. मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांच्या शिवसेना प्रवेशाच्या दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते आणि गटनेते मंदार हळबे यांनी आज प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला आहे.
काल डोंबिवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे माजी शहराध्यक्ष तसेच प्रदेश उपाध्यक्ष राजेश कदम यांनी कार्यकर्त्यांसह सोमवारी सायंकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईत शिवसेनेत प्रवेश केल्याने मनसेला डोंबिवलीत धक्का बसला होता.
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत मनसेचे माजी विरोधी पक्षनेते मंदार हळबे यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला. मंदार हळबे हे कल्याण डोंबिवली महापालिकेतील मनसेचे विद्यमान गटनेते आहेत. त्यांनी केडीएमसीमध्ये विरोधी पक्षनेतेपदही भूषवलं आहे. दहा वर्षांपासून ते नगरसेवक आहेत.
दरम्यान, सध्या कल्याण ग्रामीण मतदारसंघातील मनसेचे एकमेव आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघात शिवसेना भाजपने मनसेला खिंडार पाडण्याचं काम सुरू केलं आहे. मनसेचे अनेक पदाधिकारी शिवसेना-भाजपाच्या वाटेवर असल्याचं समजत आहे. मंदार हळबे हे आतापर्यंत २ वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत, तर मागील विधानसभा निवडणुकीत मनसेकडून डोंबिवली मतदारसंघाची तिकीट हळबेंना देण्यात आली होती, तेव्हा ३७ हजारांनी मंदार हळबे यांचा पराभव झाला होता.