उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ मुंबईत, बॉलीवूड सेलेब्रिटी आणि उद्योजकांशी करणार चर्चा

3

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बुधवारी मुंबई दौऱ्यावर असणार आहेत. योगी आदित्यनाथ बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये जाणार आहेत. त्यांनी मुंबई फिल्म इंडस्ट्रीच्या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेश मध्येही फिल्म सिटी बनवण्याची घोषणा केली आहे. यासाठी त्यांच्या सरकारने नोएडा येथे जागाही दिली असून बांधकामाचे काम वेगाने सुरू आहे. मुख्यमंत्री योगी आज काही बॉलीवूड सेलेब्रिटी आणि उद्योजकांशी उत्तर प्रदेशात गुंतवणूक करण्याबाबत चर्चा करणार आहेत.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ स्वतः नोएडामध्ये फिल्म सिटी उभारण्यासाठी आग्रही आहेत. मिळालेल्या वृत्तानुसार, बोनी कपूर, टी सिरीजचे भूषण कुमार, सुभाष घई, झी स्टुडिओचे जतीन सेठी, रणदीप हुडा, नीरज पाठक, जिमी शेरगिल, कोमल नाहता, राजकुमार संतोषी हे उपस्थित राहणार आहेत. उत्तर प्रदेशमध्ये उभारण्यात येणारी ही फिल्मसिटी कोणत्याही परिस्थितीत मुंबईहुन मागे राहू नये यासाठी मुंबईमधील बड्या चित्रपट निर्माते आणि दिगदर्शकांच्या संपर्कात योगी आदित्यनाथ आहेत.

फिल्म सिटीमध्ये कोणत्या गोष्टींवर विशेष लक्ष दिले पाहिजे याबाबत माहिती घेण्यासाठी योगी मुंबईला आले आहेत. मुंबईतील लोक उत्तर प्रदेशच्या फिल्म सिटीमध्ये काम करण्यासाठी येतील यासाठी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा सल्ला घेणार आहेत. उत्तर प्रदेश मधील प्रस्तावित फिल्म सिटी संदर्भात मुख्यमंत्री आज बॉलिवूडमधील दिग्गजांशी बैठकीत चर्चा करणार आहेत. या बैठकीत ते उत्तर प्रदेशमध्ये फिल्म सिटी बनवण्याच्या योजनांविषयी फिल्मी जगातील तज्ञांशी संवाद साधणार आहेत.

योगी आदित्यनाथ यांची टाटा सन्सचे एन.चंद्रशेखर, हिरानंदानी ग्रुपचे डाॅ.निरंजन हिरानंदानी, भारत फोर्जचे बाबा कल्याणी, सीमोन्सचे सीईओ सुप्रकाश चौधरी, एल. अँड टी चे चेअरमन एस.एन. सुब्रमण्यम, कॅपिटल सर्विसचे विकास जैन, केकेआरचे चेअरमन संजय नायर, सेंट्रम कॅपिटल लि.चे चेअरमन जसपाल बिंद्रा, टाटा अॅडव्हांस सिस्टिमचे सीईओ आणि एमडी सुकरण सिंग, टाटा डिफेन्स टेक्नाॅलाॅजीचे हर्षवर्धन, अदानी डिफेन्सचे आशिष राजवंश, अशोक लेलँडचे रजत गुप्ता, टेलिकाॅम डिफेन्स सिस्टिमचे सीईओ टी.एस.दरबारी इ. उद्योजकांना भेटतील. सोबतच मुकेश अंबानी, आनंद महिंद्रा यांचीही ते भेट घेणार आहेत.