शेतकरी कायदे मागे घेण्यासाठी दोन महिन्यांपासून शेतकरी आंदोलन करीत आहे. यावरुन राजकारणदेखील चांगलेच तापते आहे. पावसाळी अधिवेशनात या कायद्यांवर सांगोपांग चर्चेविनाच कायदे संमत करण्यात आले होते. हे कायदे कॉर्पोरेटच्या हिताचे आहे असे म्हणत शेतकरी दिल्लीच्या सिमांवर आंदोलन करत आहे.
दरम्यान या अधिवेशनात या कायद्यांवर चर्चा व्हावी असा प्रस्ताव कॉंग्रेसचे विरोधी पक्षनेते गुलाब नबी आझाद यांनी राज्यसभेसमोर ठेवला होता. त्यावर उपराष्ट्रपतींनी संमती देत १५ तासांचा वेळ याकरिता राखून ठेवला होता. परंतू चर्चा सुरु होण्यापूर्वीच आपच्या खासदारांकडून या कायद्यांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. परिणामी व्यंकय्या नायडू यांनी या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
आम आदमी पार्टीचे संजय सिंह, नरीनदास गुप्ता, सुशील गुप्ता या ३ खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एएनआय वृत्तसंस्थेने ही माहिती दिली आहे.
शेतकरी कायद्यांचा विरोध केला असता आमच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. मात्र आम आदमी पार्टी एवढ्यावरच थांबणार नाही. रस्त्यापासून ते सदनापर्यंत या काळ्या कायद्यांचा विरोध आम्ही करतच राहू अशी टॅगलाईन देत आपने व्हिडीअो ट्वीट केला आहे. ज्यामध्ये खासदारांना जबरदस्ती सभागृहाबाहेर नेण्यात येत आहे.