शिर्डीत साईंच्या दर्शनासाठी भाविकांची मर्यादा वाढवली; आता रोज ‘इतके’ भाविक रोज घेणार दर्शन

5

शिर्डीच्या साई बाबा मंदिरातील भाविकांची दर्शन मर्यादा वाढवण्यात आली असून, अनलॉकनंतर आतापर्यंत रोज 6 हजार भाविकांना दर्शनाची परवानगी मिळत होती. मात्र, आता रोज 12 हजार भाविकांना साई बाबांच दर्शन मिळणार आहे.  दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंग करावं असं आवाहनही साई संस्थानकडून करण्यात आलं आहे. नाताळमुळे गर्दीच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

साई संस्थानकडून रोज 12 हजार भाविकांना दर्शन देण्याची तयारी केली आहे. त्यात 8 हजार भक्तांना ऑनलाईन फ्री पास तर 4 हजार भक्तांना ऑनलाईन पेड पास दिले जाणार आहेत. 31 डिसेंबरला मंदिर खुलं ठेवायचं की नाही, याबाबत अद्याप निर्णय झाला नसल्याची माहिती संस्थांचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली आहे.

साईंच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे साई संस्थानकडून रोज दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची मर्यादा वाढवण्यात आली आहे. मात्र, जास्त गर्दी झाल्यास दर्शन बंद केलं जाणार असल्याचंही संस्थानकडून स्पष्ट करण्यात आलंय. तर सुट्टीच्या दिवशी शिर्डीमध्ये ऑफलाईन बुकिंग काऊंटर बंद ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती मिळाली आहे.