अमेझोन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्म वर प्रदर्शित झालेली तांडव वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे. वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृश्यामुळे हिंदू देवदेवतांचा अपमान झाला असल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. या प्रकरणी आज घाटकोपर पश्चिमचे भाजप आमदार राम कदम यांनी घाटकोपर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढला.
यावेळी तांडव वेब सिरीजचे निर्माते , दिग्दर्शक आणि अभिनेता यांच्यावर कडक कारवाई करून गुन्हा दाखल करण्याची मागणी आमदार राम कदम यांनी केली. यावेळी घाटकोपर पोलिस ठाण्याबाहेर भाजप कार्यकर्त्यानी तांडव वेब सिरिज विरोधात घोषणा देत हिंदू देवतांवो का अपमान, नही सहेगा हिंदुस्थान, बंद करा बंद करा तांडव सिरीज बंद करा अशा घोषणा दिल्या.
‘तांडव’ वेब सिरीजमध्ये दाखवण्यात आलेल्या एका दृष्यात भगवान शंकर यांच्यावर एक आक्षेपार्ह संभाषण केल्याने देशातील समस्त हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे आम्ही या वेब सिरीजला विरोध करून ती बंद करण्याची मागणी करत आहोत जो पर्यंत गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत पोलिस ठाण्यातून हटणार नाही अशी भूमिका कदम यांनी घेतली असता पोलिसांनी राम कदम यांना कारवाईचे आश्वासन दिले.