पुण्यात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना होणार: क्रीडामंत्री सुनील केदार

8

भारतातील पहिले आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ पुण्यातील शिवछत्रपती क्रीडा संकुलात स्थापन करण्यात येणार आहे. ही माहिती क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी दिली आहे. यावेळी बैठकी दरम्यान आमदार अशोक पवार, शिक्षण तज्ञ डॉ. जवाहर सुरीशेट्टी, क्रीडा आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधीकरणचे महानगर आयुक्त सुहास दिवसे हे उपस्थित होते.

यावेळी केदार म्हणाले, राज्याची क्रीडा विषयक कामगिरी आणखी उंचावणे, क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध असलेली विविध क्षेत्रे विचारात घेऊन क्रीडा क्षेत्रात नोकरीच्या आणि प्रशिक्षणाच्या अधिकाधिक संधी उपलब्ध व्हाव्यात व तरुण वर्गास क्रीडा क्षेत्रात येण्यास प्रोत्साहन मिळावे, यासाठी राज्यात जास्तीत जास्त दर्जेदार कोच/प्रशिक्षक तसेच, खेळाडू निर्माण व्हावेत, हा आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ स्थापनेचा उद्देश आहे. क्रीडा हा शिक्षणाचा अविभाज्य असून क्रीडा व शैक्षणिक गुणवत्ता महत्त्वाची असल्याने क्रीडा क्षेत्राला गतिमानतेने पुढे नेण्यासाठी क्रीडा वैद्यकशास्त्र व पुरक बाबींमध्ये आवश्यक तांत्रिक मनुष्यबळ निर्माण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

क्रीडा विषयक प्रगत अभ्यासक्रम राज्यातील खेळाडू, प्रशिक्षक यांना करता यावेत यासाठी क्रीडा विद्यापीठ असणे आवश्यक आहे, असेही श्री. केदार म्हणाले. विधानमंडळ अधिवेशनात आंतरराष्ट्रीय क्रीडा विद्यापीठ अधिनियम महाराष्ट्र मंजूर करण्यात आला आहे. राज्यात पुण्यातील बालेवाडी येथे सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुल सुरु आहे.

या क्रीडा संकुलात विविध खेळांच्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा उपलब्ध केल्या आहेत. या सुविधांचे अद्ययावतीकरण तसेच नवीन सुविधा उपलब्ध करण्याची कार्यवाही सातत्याने होत असते. यामुळे हे विद्यापीठ सध्या शिवछत्रपती क्रीडा संकुलात कार्यान्वित करण्यात येणार आहे व नंतरच्या कालावधीत या विद्यापीठाकरीता स्वतंत्र इमारत बांधकाम करण्यात येईल. यासाठी अनावर्ती खर्च रु. २०० कोटी व विद्यापीठ कॉर्पस फंडसाठी रु.२०० कोटी याप्रमाणे एकूण रु.४०० कोटी खर्च अपेक्षित असल्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.