आयपीएल स्पर्धा रद्द, मात्र एका आठवड्यात आयपीएल पुन्हा ‘या’ शहरात सुरू होऊ शकते

28

मुंबई : राज्य आणि देशात गेल्या काही आठवड्यापासून कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. या काळात भारतात आयपीएल स्पर्धा सुरु आहे. या स्पर्धेचा पहिला टप्पा यशस्वीपणे पार पडला. मात्र स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात कोरोनाने आयपीएलला गाठले. स्पर्धेत कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आयपीएल स्पर्धा ही अनिश्चीत काळासाठी रद्द करण्यात आली आहे. बीसीसीआयने एक पत्रक जाहीर करुन ही माहिती दिली आहे.

आयपीएल जरी अनिश्चीत काळासाठी रद्द केले तरीही बीसीसीआयचा उर्वरीत आयपीएल स्पर्धेसाठी बॅकअप प्लान तयार असल्याची माहिती समोर येत आहे. स्पर्धेतील उर्वरित सामने हे येत्या आठवड्यात मुंबईला हलवण्यात येईल अशी माहिती समोर आली आहे.

मुंबईमध्ये या आधी स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामने झाले होते. आणि महत्वाची बाब म्हणजे मुंबईत वानखेडे स्टेडियम, ब्रेबोन स्टेडियम आणि डीवाय पाटील अशी एकुण तीन स्टेडियम आहे. त्यामुळे उर्वरीत पुर्ण हंगाम मुंबईत घेणे शक्य होईल. यादरम्यान बीसीसीआय मुंबईतील कोरोना परिस्थितीवर लक्ष केंद्रित करून आहे.

मात्र या आठ दिवसाच्या स्थगितीमुळे आयपीएलस्पर्धेच्या नियमीत वेळापत्रकात बदल होऊन अंतिम सामना हा ३० मे रोजी न होता जुनच्या पहिल्या आठवड्यात होईल. आयपीएल २०२१ च्या पहिल्या टप्प्यातील सामने मुंबई आणि चेन्नईमध्ये खेळवले गेले होते. आता दुसऱ्या टप्प्यातील सामने दिल्ली आणि अहमदाबादमध्ये खेळवण्यात येत होते.

मात्र सोमवारी ३ मे रोजी केकेआर संघातील २ खेळाडू, सीएसकेच्या संघातील ३ सदस्य आणि अरुण जेटली स्टेडियमच्या ग्राउंड स्टाफमधील ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे आयपीएल स्पर्धा अनिश्चित काळासाठी रद्द करण्यात आली आहे.