बिनविरोध निवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतीला विकासासाठी 25 लाखांचा निधी देण्याची घोषणा लंके यांनी केली होती.माघार घेणाऱ्या विरोधकांचे राजकीय पुनर्वसन करण्याची जबाबदारी माझी आहे. मी दिलेला शब्द पाळणारा माणूस असल्याने आज आमदार आहे, असे प्रतिपादन आमदार नीलेश लंके यांनी केले.
ग्रामपंचायत निवडणुकीत संघर्ष व्हायचा. अटीतटीच्या लढती होत. मात्र, सुमारे 15 वर्षांच्या संघर्षानंतर आज आपण एका व्यासपीठावर आलो. हंगे गावच्या इतिहासात हा सुवर्णाक्षरांनी लिहिण्याजोगा प्रसंग असल्याचे लंके म्हणाले.
दरम्यान, लंके यांचे गाव असलेल्या हंगे या गावाकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. इतर गावांना बिनविरोधचा नारा दिल्याने ते स्वतःचेच गाव बिनविरोध करू शकतात का, याबाबत उत्सुकता होती.
गेल्या अनेक वर्षांचा राजकीय विरोध झुगारून मनाचा मोठेपणा दाखवित विरोधकांनी माझ्यावर विश्वास टाकत हंगे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध केली.हंगे ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर गावात विजयी सभा झाली. त्यावेळी लंके बोलत होते. ते म्हणाले, “”ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे श्रेय सर्व ग्रामस्थांचे आहे, माझे नाही. सर्वांनी राग-लोभ विसरून एकत्र येत मतभेदांना तिलांजली दिल्याने आता हंगे एक परिवार म्हणून ओळखले जाईल.”