ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची गळाभेट नव्हे; संजय राऊत

83

शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांची मुलगी पूर्वशी हिचा साखरपूडा रविवारी पार पडला आहे. ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्याशी तिचा साखरपुडा पार पडला. राऊत यांच्या घरचे हे पहिलेच मंगलकार्य आहे. या कार्यक्रमा दरम्यान अनेक राजकीय पक्षांची नेतेमंडळींची पाहायला मिळाली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस देखीक या सोहळ्याला हजर होते. व्यासपीठावर मुलीला शुभेच्छा देताना देवेंद्र फडणवीस आणि संजय राऊत यांच्यात गळाभेट झाली.

देवेंद्र फडणवीस आणि माझ्या गळाभेटीत काय गैर आहे. ती काही शिवाजी महाराज आणि अफझलखानाची गळाभेट नव्हती, अशी टिप्पणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसही या समारंभाला आले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळाच्या भुवया उंचावल्या गेल्या होत्या. यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी या कार्यक्रमाला हजेरी लावली.

तेव्हा संजय राऊत यांनी म्हटले की, महाराष्ट्रात कोणी एकमेकांची गळाभेट घेत नाही का? मी फडणवीसांची गळाभेट घेतली. ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजलखानाची गळाभेट नव्हे. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विचारधारेचे राजकीय नेते एकमेकांच्या घरी अशा समारंभांसाठी जात असतात. बाळासाहेब ठाकरे यांच्या पुतळ्याच्या अनावरणावेळीही सर्व राजकीय पक्षांचे नेते उपस्थित होते. त्यामुळेच महाराष्ट्र हे संस्कृती आणि परंपरा असणारे राज्य म्हणून ओळखले जाते, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.