जयंत पाटलांच्या मुख्यमंत्री होण्याच्या ‘त्या’ वक्तव्यावर खुद्द जयंत पाटलांचा खुलासा

50

मुख्यमंत्रिपदाचे स्वप्न पाहणे हे नक्कीच ‘दिवास्वप्न’ नाही, तर राजकारणातील शक्तीने हे स्वप्न हस्तगत करणं हेच आपलं उद्दिष्ट आहे, असं जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी म्हटलं आहे. पाटलांच्या या वक्तव्यामुळे आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. सोबतच राजकीय चर्चेला तोंड फुटलं आहे.

इस्लामपुरातील एका कार्यक्रमासाठी जयंत पाटील आले असता, त्यांनी एका स्थानिक चॅनेलशी बोलताना मुख्यमंत्रीपदाबाबतचं आपले मत व्यक्त केले. मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न साकार करण्यासाठी पक्ष बांधणी आणि आमदारांचं संख्याबळ वाढवणे यासाठी मोठे प्रयत्न करावे लागतील, असे जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जयंत पाटील यांचे मुख्यमंत्रीपदाबाबतचे वक्तव्य सर्वत्र प्रसारित झाल्यानंतर ह्यावर स्वतः जयंत पाटील यांनी एक फेसबुक पोस्ट करत प्रतिक्रिया दिली आहे. ‘इस्लामपूर येथील एका स्थानिक माध्यमाला मी दिलेल्या मुलाखतीचे जसेच्या तसे वार्तांकन लोकमत मध्ये आलेले असून, माझ्या विधानाची मोडतोड करून दिशाभूल करणारे वार्तांकन प्रसारमाध्यमांनी करू नये हि विनंती’, असं जयंत पाटील यांनी म्हटले आहे.