ठाणे – पालघर जिल्ह्यात “जिजाऊ”ची अनोखी भाऊबीज

1

5000 डॉक्टर्स, आशा सेविका, परिचारीका, पोलिस यांना “पैठणी”ची ओवळणी

कोरोना या जागतिक महामारीच्या काळात केलेल्या अद्वितीय कार्याबद्दल जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने ठाणे – पालघर जिल्ह्यातील सर्व डॉक्टर्स, आशा सेविका, परिचारीका, पोलिस, मदतनीस यांना मानाची “पैठणी” भेट देत अनोखी “कृतज्ञतेची भाऊबीज” केली… भाऊबीजेच्या दिवशी ठाणे – पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्व आरोग्य केंद्रात हा अनोखा सोहळा पार पडला…


कोरोना काळात अवघे जग लॉकडाऊन असताना खऱ्या अर्थाने मैदानात उतरून मानवतेची सेवा केली असेल तर ती डॉक्टर्स, परिचारिका, आशा सेविका, मदतनीस, अंगणवाडी सेविका, शिक्षक, पोलिस यांनी… डॉक्टर्स, आशा सेविका, परिचारिका, मदतनीस यांनी घरोघरी जाऊन शेवटच्या माणसांना तपासून त्यांच्यापर्यंत मदत पोहोचविण्याचे काम केले. त्यांच्या या महान कार्याबद्दल भाऊबीजेच्या दिवशी जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या वतीने “कृतज्ञतेची भाऊबीज” करत मानाची पैठणी भेट देत त्यांना गौरवण्यात आले. ठाण्यातील छत्रपती शिवजी हॉस्पिटल, सिव्हील हॉस्पिटल, गोडबोले हॉस्पिटल तसेच ठाणे – पालघर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील सर्वच आरोग्य केंद्रांमध्ये तब्बल 5000 हुन अधिक डॉक्टर्स, आशा सेविका, परिचारीका, पोलिस, मदतनीस यांना ही मानाची पैठणी भेट देण्यात आली.

जिजाऊ संस्थेचे संस्थापक श्री. निलेशजी सांबरे व महिला सक्षमीकरण प्रमुख मोनिकाताई पानवे यांच्या संकल्पनेने आणि प्रेरणेने ही कृतज्ञतेची अनोखी भाऊबीज पार पडली…
” कोरोनाचे भयावह संकट असतानाही या संकटाच्या काळात डॉक्टर्स, परिचारीका, आशा सेविका, मदतनीस यांनी केलेले महान काम शब्दात व्यक्त होण्यासारखे नाही. त्यामुळे भावाच्या नात्याने भाऊबीजेच्या दिवशी कोरोना योद्धा असणाऱ्या आमच्या हजारो बहिणींना त्यांची आवडती पैठणी साडी भेट देवून आम्ही त्यांचा गौरव केला आहे,” अशी प्रतिक्रिया जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी व्यक्त केली. तर “आजपर्यंत अशा प्रकारची भाऊबीज करून कुणीच आमच्या कामाचे कौतुक करून आम्हाला प्रेरणा दिली नाही, जिजाऊ संस्थेने आम्हाला भाऊबीजेची जी अनोखी भेट दिली आहे ती आम्ही कधीच विसरणार नाही”, अशी भावना यावेळी आशा सेविका, परिचारीका यांनी व्यक्त केली..