प्रतिनिधी आशा रणखांबे कल्याण/ ठाणे
ठाण्यातील सर्वात पहिले स्थापन झालेले महाविद्यालय असा लौकिक असणाऱ्या जोशी – बेडेकर महाविद्यालयास विद्यापीठ अनुदान आयोगाने स्वायत्तता प्रदान केली आहे.
उच्च शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च संस्था असणाऱ्या विद्यापीठ अनुदान आयोगानुसार उच्च शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी महाविद्यालयांना शैक्षणिक स्वायत्तता देणे आवश्यक आहे. नँकच्या पाहणीत ‘अ’ दर्जा प्राप्त करणारी महाविद्यालये स्वायत्ततेसाठी अर्ज करू शकतात. त्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगातर्फे एक टीम महाविद्यालयास भेट देऊन महाविद्यालयाशी संबंधित विविध घटकांची पाहणी करून त्यानंतर स्वायत्तता प्रदान करते. जोशी-बेडेकर महाविद्यालयाला ५ व ६ नोव्हेंबर रोजी अशा प्रकारचा विद्यापीठ आयोग नियुक्त सदस्यांचा दौरा झाला व महाविद्यालयासही स्वायत्तता प्रदान करण्यात आली.
यासाठी महाविद्यालयाने प्राचार्या डॉ. सुचित्रा नाईक यांच्या नेतृत्वाखाली व विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न केले.
यापूर्वी २०११-१२ साली महाविद्यालयाला सर्वोत्कृष्ट महाविद्यालय म्हणून गौरवण्यात आले होते. EICON तर्फे महाविद्यालयाला ‘Best College For Academic excellence ‘ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याचप्रमाणे महाविद्यालय गेली काही वर्ष सातत्याने युथ फेस्टिवल मध्ये ठाणे झोनमध्ये पहिल्या क्रमांकावर असते. नुकत्याच झालेल्या ऑनलाइन परीक्षात महाविद्यालयाने क्लस्टर स्तरावर लीड कॉलेज म्हणून महत्त्वाची भूमिका पार पाडली.
स्वायत्ततेमुळे विद्यार्थीभिमुख कोर्सेस घेणे तसेच अभ्यासक्रमात कालानुरूप आवश्यक असे काही बदल करणे महाविद्यालयाला शक्य होईल.