पुण्यातील कोरोनाच्या रुग्णांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे. करोनाच्या रुग्णांवर उपचार करण्यासाठी शिवाजीनगर येथील ‘सीओईपी’ मैदानावरील जम्बो कोविड हॉस्पिटल हे तात्पुरते बंद करण्यात येत आहेत. जम्बो सेंटर तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. तसेच शासकीय व खासगी रुग्णालयांमध्येही कोविड वॉर्डांतील बेड रिक्त झाले आहेत.
रुग्णांची संख्या वाढली, तर सात दिवसांच्या आत पुन्हा जम्बो हॉस्पिटल सुरू करण्यात येईल,’ असे स्पष्टीकरण विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी बुधवारी दिले आहे. ससून हॉस्पिटल, डॉ. नायडू हॉस्पिटल, बाणेर कोविड सेंटर, पिंपरी येथील वायसीएम रुग्णालय आणि ऑटो क्लस्टर रुग्णालयांमध्ये बेड रिक्त आहेत. यामुळे जम्बो हॉस्पिटल तात्पुरते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना रुग्ण संपेपर्यंत हे जम्बो कोविड सेंटर बंद केलं जाणार नाही, असं राज्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. पण आता मोठ्या प्रमाणात कोविडचे रुग्ण येण्याची संख्या कमी झाल्याने हे जम्बो कोविड सेंटर बंद करण्याचा निर्णय घेतला जात आहे. पुण्यातील पिंपरी चिंचवडमधील ६०० खाटा असलेलं जम्बो कोविड सेंटर सुरु राहणार आहे, गरज पडल्यास किंवा जवळ असल्यास पुण्यातील रुग्णांना पिंपरी चिंचवडमध्ये दाखल होवून उपचार घेता येणार आहेत.