चक्क नगराध्यक्ष आणि मुख्याधिकार्‍यांमध्ये जुंपली! वादावादीचे रुपांतर धक्काबुक्कीत!

60

राजकीय लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांच्यात कायमच वादाच्या ठिणग्या ऊडत असल्याचे संपूर्ण महाराष्ट्रात विविधठिकाणी आपण बघितले आहे. मात्र वाद विकोपाला गेल्यास काय होते याचे दृश्य वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात बघावयास मिळाले आहे. कारंजा येथील नगरपरिषदेचे अध्यक्ष शेषराव ढोके आणि येथीलच मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर यांच्यात एका कारवाईदरम्यान चांगलीच जुंपली आहे. रस्त्यावरच वाद ईतका विकोपास गेला की दोघांनीही एकमेकांच्या थेट अंगावर धाव घेतली होती. स्थानिकांनी मध्यस्थी करत प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला.

जिल्ह्यात गुटखाविक्री जोमात सुरु असल्याचे चित्र आहे. यावरुनच गुटखाविरोधी मोहीम ऊघडून प्रशासनाच्यावतीने अवैध गुटखाविक्री करणार्‍यांवर धडक कारवाया केल्या जात आहे. याच कारवाईचा भाग बनून मुख्याधिकारी कारवाईसाठी गेले असता, नगराध्यक्ष महोदयांनी याच कारवाईस हस्तक्षेप नोंदविला. आणि त्यावरुनच दोघांमध्ये वाद झाला. असे बोलले जात आहे. वाद विकोपास जाऊन दोघांनिही एकमेकांच्या अंगवार धाव घेतल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगीतले आहे. यावेळी ऊपस्थित पत्रकारांनासुद्धा धाक दाखवण्याचा प्रकार घडला आहे. लोकशाहीच्या चौथ्या स्तंभाची गळचेपी करण्याच्या या प्रकाराचा मराठी पत्रकार संघाने निषेध नोंदवला आहे.

लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी हे जनतेचे सेवक तसेच समाजातील प्रतिष्ठित व्यक्तीमत्व असतात. समाज त्यांचा आदर्श घेऊन चालत असतो. त्यांचेकडून असा प्रकार घडणे म्हणजे एकप्रकारचे दुर्दैव म्हणायचे. संबंद्धित प्रकारामुळे अशाप्रकारच्या घटनाही घडू शकतात याचे कारंजावासियांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे.