अनिल देशमुख यांचे पुतणे असलेले काँग्रेसचे नेते आशिष देशमुख यांनी त्यांच्यावर आरोप केला असल्याने नागपुरातील काका पुतण्यामधील का रे हा दुरावा या निमित्ताने जनतेसमोर आला आहे.
काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी त्यांचे काका तथा गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्याने हा संघर्ष पुन्हा नव्याने पेटण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. त्यातही आशिष देशमुख यांनी भविष्यात काटोल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची तयारी असल्याचे संकेत दिले आहेत.
काटोल मतदारसंघात गृहमंत्री विकासाच्या बाबतीत पुर्णतः अपयशी ठरले आहेत. ते गृहमंत्री असताना काटोल आणि नरखेड या दोन तालुक्यात मोठ्या प्रमाणात अवैध धंदे सुरू झाले आहेत. सट्टा, अवैध दारू, वाळूचे अवैध धंद्यात राजकीय नेते गुंतले असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.
गेल्या काही दिवसांपासून राजकारणात पडद्यामागे राहून सक्रिय असलेले कॉग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मात्र आता मित्र पक्षाचे आमदार तथा राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप चालविले आहेत.
गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. ते राष्ट्रवादी परिवार संवादाच्या नावाने कार्यकर्त्यांचे मेळावे घेत आहेत. असाच एक मेळावा काल काटोल मतदारसंघात त्यांनी घेतला. यावर आशिष देशमुख यांनी आक्षेप नोंदविला आहे.