काँग्रेसचे दिग्गज नेते कपिल सिब्बल यांनी बिहार निवडणुकीत काँग्रेसचा झालेला पराभव जिव्हारी लागला आहे. काँग्रेसच्या पराभवावरून त्यांनी पक्षश्रेष्ठींवर निशाणा साधला आहे. पक्षाने कदाचित प्रत्येक निवडणूकीत पराभव होणारच हेच आपलं नशीब असल्याचं मानलं आहे, असं म्हणत त्यांनी पक्षाला घरचा आहेरही दिला आहे. काँग्रेस नेतृत्वाला बिहारचा पराभव सामान्य वाटत असावा, असंही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल म्हणाले.
इंडियन एक्स्प्रेसला दिलेल्या मुलाखतीत बोलताना कपिल सिब्बल बोलत होते, ‘बिहारच नाही तर देशात ज्या ठिकाणी पोटनिवडणुका झाल्या तेथील जनतेनं काँग्रेसला नाकारलं आहे. गुजरातच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसला एकाही जागेवर विजय मिळालेला नाही. तीन ठिकाणी उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे. लोकसभा निवडणुकीत गुजरातमध्येही हेच घडलं. उत्तर प्रदेशच्या पोटनिवडणुकीतही काही ठिकाणी काँग्रेसच्या उमेदवारांना दोन टक्के मतं मिळाली आहेत. त्यामुळे जनतेचा स्पष्ट संदेश आहे की त्यांनी काँग्रेसला नाकारले आहे.’ असं सिब्बल यांनी म्हटलं आहे.