कार्तिकी वारी वारकऱ्यांच्या मर्यादित संख्येत पार पाडावी : नाना पटोले

3

राज्याला शेकडो वर्षांची संत परंपरा लाभली आहे. सांस्कृतिक आणि धार्मिक समतेचा संदेश देणाऱ्या वारकरी संप्रदायास परंपरेनुसार वारीसाठी सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे असून पंढरपूर येथील कार्तिकी वारीसाठी विविध सुविधा आणि सुरक्षेसाठी सुयोग्य नियोजन करण्यात यावे. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर वारकऱ्यांनी दिलेल्या प्रस्तावानुसार मर्यादित संख्येतील वारकऱ्यांच्या उपस्थितीत ही वारी परंपरा यशस्वी व्हावी, असे विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

विधानभवन येथे वारीदरम्यान येणाऱ्या समस्या आणि कोरोना पार्श्वभूमीवर वारीचे नियोजन करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने, बांधकाम विभागाचे सचिव अ.ब. गायकवाड, ऊर्जा विभागाचे उपसचिव प्र.पु.बडगेरी, नगरविकास विभागाचे उपसचिव स.ज. मोघे, एस.टी. महामंडळाचे महाव्यवस्थापक संजय सुपेकर,आदींसह वारकरी परिषद संस्थान यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

 
विधानसभा अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर यंदा पंढरपूर येथील कार्तिकी वारी आणि 8 डिसेंबरला होणारी आळंदी वारी ही किमान वारकऱ्यांच्या उपस्थितीत पार पाडावी, याबाबत सकारात्मक निर्णय घेण्यात येत आहे. वारीदरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येतील. तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंतर्गत वारकऱ्यांच्या पालख्यांसाठी 34 विश्रांतीस्थळांना कायमस्वरुपी जागा मिळावी. यासाठी सर्व्हे करून जागा उपलब्ध करून देण्यात यावी. ज्या मार्गांवरून पालखी जाते, त्या रस्त्यांची डागडुजी विविध रस्ते बांधणी योजनेंतर्गत पूर्ण करावी, दरवर्षी होणाऱ्या वारी व अन्य कार्यक्रमांसाठी न्यायालयाच्या आदेशांच्या अधिन राहून हे कार्यक्रम चंद्रभागेच्या वाळवंटात होतील यासंदर्भात योग्य ती कार्यवाही करण्याचे निर्देशही श्री. पटोले यांनी दिले.