मराठा समाजाच्या आरक्षणासाठीच सर्व राजे एकटवणार असतील तर आम्ही देखील अठरापगड जातीचे मावळे जमवून ओबीसी आरक्षणाचे रक्षण करु,असे वक्तव्य ओबीसी समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केले. ते शनिवारी सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
यावेळी त्यांनी ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत संबंधितांना इशारा दिला आहे. आरक्षणाचा खेळखंडोबा सुरु आहे. अठरापगड जातींचं आरक्षण हडप करण्याचा त्यावर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोपच प्रकाश शेंडगे यांनी केला.
13 टक्के मराठा समाजासाठी इतरांचे हाल सुरू असल्याचा आरोप प्रकाश शेंडगे यांनी केला आहे. राज्यात सर्व 75 टक्के नोकरभरतीच्या प्रक्रिया थांबल्या आहेत. ओबीसी समाजाच्या नोकऱ्यांवर आणि हक्कावर गदा आणली जात आहे. 13 टक्के मराठा बांधवांसाठी 87 टक्के एससी, ओबीसी आणि अन्य प्रवर्गातील नागरिकांचे हाल सुरु असल्याचे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले.
मराठा समाजाला आरक्षण देण्यास आमचा विरोध नाही. मात्र, ओबीसीच्या कोट्यातून त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. आमचे आरक्षण गिळंकृत करण्याचा डाव आखला जात आहे, असे प्रकाश शेंडगे यांनी म्हटले. त्यामुळे आता यावर आता काय पडसाद उमटणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.