स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयातर्फे जागतिक शौचालय दिनानिमित्त होणाऱ्या कार्यक्रमामध्ये कोल्हापूर आणि नाशिक या जिल्ह्यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. ग्रामीण स्वच्छता क्षेत्रातील या विशेष पुरस्कारामुळे राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे.
केंद्र सरकारच्या पेयजल व स्वच्छता विभागाच्या वतीने जागतिक शौचालय दिनानिमित्ताने देशभरातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यांबाबत स्वच्छतेच्या अनेक निकषांचे विश्लेषण आणि अभ्यास करून २० जिल्ह्यांची पुरस्कारासाठी निवड केली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि नाशिक या दोन जिल्ह्यांचा समावेश आहे.
दि. १९ नोव्हेंबर २०२० रोजी जागतिक शौचालय दिनानिमित्त या दोन्ही जिल्ह्यांना पुरस्काराचे वितरण होणार आहे. केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेन्द्रसिंग शेखावत आणि राज्यमंत्री रतनलाल कटारिया यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पुरस्काराचे व्हिडिओ प्रणालीद्वारे वितरण होणार आहे.
२ ऑक्टोबर २०२० रोजी झालेल्या स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात राज्याला ५ पुरस्कार मिळाले होते, आज आणखी दोन जिल्ह्यांना पुरस्कार घोषित होणे ही राज्यासाठी निश्चितच अभिमानाची गोष्ट आहे असे मत, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केले.